छत्रपती संबाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): पती पत्नीच्या दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील करमाड येथील रविराज हॉटेलसमोर घडली.
चैनसिंग शिवसिंग मारग (वय ७०, रा. वडाचीवाडी, ता. छत्रपती संभाजीनगर) हे पत्नी कस्तुराबाई चैनसिंग मारग (वय ६५) यांच्यासह दुचाकीने (क्र. एमएच २० ईपी ७१३४) गोलटगावकडून करमाडकडे येत होते. रविराज हॉटेलसमोर आले असता त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
यात दोघेही गंभीर जखमी झाले. नाणीजधाम सेवेच्या रुग्णवाहिकेतून जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी चैनसिंग यांना मृत घोषित केले. कस्तुराबाई यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. याप्रकरणी करमाड पोलिसांकडून तपास सुरू आहे. चैनसिंग मारग यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.















